Saturday 9 November 2019

yatharth Diary

''लव्ह यू यदा''... ए यार आई लव्ह यू नको म्हणत जाऊ ना सारखं सारखं...
ऑ..आता काय झालं रे ढंप्या... शोनं माझं..
वरंचं वाक्य तो नकळत बोलून गेला...पण मी मात्र, त्याच्या गर्भात समावल्यापासून आतापर्यंतच्या तर मोठा होईल तेव्हा काय! अशा फ्लॅशबॅकमध्येच गेले लगेच .
तसे मनात संवाद सुरू झाले...
तुलना हीच वेळ आहे. हवा तेवढा लाड करून घे लेकराचा... दोन वर्षे होत आली मांडीवर अंगाई गात झोपणारं लेकरू हल्ली तर मांडीवर पण बसत नाही. एखाद्या गोष्टीवर आता ठामपणे बोलायलादेखील लागलाय. मायेची नाळ सैल होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. रागावून सांगण्यापेक्षा कितीही वैताग आणला तरी प्रेमानेच सांगत जा... दूरून आवाज देण्याऐवजी जवळ जाऊन हातात हात घेऊन घरात आणत जा... हीच वेळ आहे मायेची नाळ कायमस्वरूपी जोडून ठेवण्यासाठी. आईच्य़ा काळजीची जाणिव होईल असं वागण्याची. आई - मुलाचं नातं घट्ट असेल तर बचपन की डोर का हा धागा कायम जुडून राहायला मदत होते. असं बरंच काही मनात येऊन गेलं... मी पाहतेय त्यांला, त्याचं निरिक्षण, त्याची चौकस लक्ष असणारी वृत्ती, पुर्ण वेळची आई आणि आताची अर्धवेळची आईे. हा बदल त्याला स्पष्ट जाणवतोय. पाळणाघर आणि घर यातला फरक आधी कृतींतून, भावनेतून सांगायचा आता शब्दांतून सांगतोय. मात्र, जे जसं आहे त्याचा पॉझीटीव्ह स्विकार कसा करायचा हे समजावून सांगणं हे खरं आव्हान आहे. खूप प्रश्न असतात लहान मुलांचे. आई झाडाला देव म्हणायचं का? मोबाईल मधला भूत बाहेर येऊ शकतो का? आई तू तर म्हणते रेड सिग्नलमध्ये थांबायचं, ग्रीन लाईट लागला की जायचं! मग आपल्या बाजूचे सगळे जण तर रेडलाईट मध्येच जात आहेत. रस्त्यात मग काही लोकं स्पीट का करतात? किती बॅड हॅबीट वगैरे वगैरे...
आपणंच बुचकळ्यात पडतो या निरागसांना काय उत्तर द्यायचं.
चांगलं काय?
वाईट काय?. चांगलं ते कसं?... वाईट ते का?
हे सांगणं म्हणजे कस लागतो.  आदर्श सवयी ज्या आई आणि शिक्षकांनी सांगितल्या असतात. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर सगळीकडे त्याच्या उलट घडतानाच त्याला दिसेल तेव्हा त्याला आईची आठवण व्हावी. ही प्रामाणिक अपेक्षा म्हणा किंवा प्रेम...
हे सुंदर जग तुला पाहता यावं, यासाठी गर्भातली नाळ तोडावी लागली असली तरी, ही मायेची नाळ कधीही सैलदेखील होऊ नये. अशा संस्कारात तू वाढावा हाच माझा प्रयत्न....

0 comments:

Post a Comment